विजेच्या धक्क्याने कुटुंबातील तिघांचा मृत्यू

। पुणे । वृत्तसंस्था ।

पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दौंड जिल्ह्यात वीजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेचा धक्का लागल्याने पती-पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, मुलगी बाहेर गेल्याने या दुर्घटनेतुन बचावली गेली आहे.

सुनील भालेकर (45) हे आपल्या कुटुंबासह एका पत्राच्या खोलीत राहात होते. राहत्या घरातील तारेला विद्युत प्रवाह उतरल्याने सुनिल हे अंघोळसाठी जात असताना कपडे टाकायच्या तारेवर टॉवेल टाकताना त्यांना विजेचा धक्का बसला. पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहून पत्नी (38) हिने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, पत्नीसह त्यांचा मुलगाही मदतीसाठी धावला. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी सुदैवाने त्यांची मुलगी वैष्णवी ही बाहेर गेली होती, त्यामुळे ती या दुर्घटनेतून वाचली आहे.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस तसेच, महावितरण वीज कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version