| महाड | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सवाद येथील महिला सरपंचाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तालुक्यातील सवाद या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून त्या कार्यरत आहेत. सविस्तर माहिती अशी की सवाद गावातील हनुमान मंदिरामागे जेसीबी मशीनच्या सहायाने खोदकाम सुरू होते, हे काम पाहण्यासाठी सरपंच व उपसरपंच घटनास्थळी पोहोचून विचारणा करीत होते. मात्र, खोदकाम करणाऱ्याने उलट जबाब करीत सरपंच व उपसरपंच यांना तुम्ही काम बंद करणारे कोण, असे बोलून तुमची अडीच वर्षात खूप नाटके चालले आहेत. आता तुम्हाला बघतो अशी धमकी दिली. यानंतर खोदकाम करणाऱ्याने महिला सरपंचांना शिवीगाळी व दमदाटी केली, तसेच तुम्ही कोण सरपंच मी नाही कोणाला घाबरत असे बोलून सोबत आणलेला कोयता दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाबाबत सरपंचांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला. पोलादपूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने महिला सरपंचांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शासन महिलांसाठी मजबूत कायदा बनवीत असून दुसरीकडे महिला सरपंचाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली जाते. सदर प्रकरणाबाबत पोलादपूर पोलिसांवर कोणाचा दबाव होता का तसेच धमकी देणारा सत्तेतील राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे का हे पाहणे आता गरजेचं असून महिला सरपंचाला योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
महिला सरपंचाला जीवे ठार मारण्याची धमकी
