नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तीची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

नोकरीच्या शोधात असलेल्या कामोठे भागात राहणाऱ्या एका बेरोजगार व्यक्तीला दोघा सायबर चोरट्यांनी डेटा एंटी आणि ॲडमिनिस्टेटीव्हचा जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून 34,800 रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.

कामोठे सेक्टर-19 मध्ये राहणारे सुरेश लक्ष्मण आचार्य (49) यांचे कोरोना काळात काम सुटल्यानंतर ते बेरोजगार झाले होते. त्यानंतर ते नोकरीच्या शोधात असताना त्यांनी आपला बायोडेटा ऑनलाइन पोर्टलवर टाकला होता. गत महिन्यात एका अज्ञात महिलेने नोकरी डॉट कॉमची प्रतिनिधी असल्याचे भासवून आचार्य यांना संपर्क साधला होता. तसेच नवी मुंबईमध्ये डेटा एंट्री आणि ॲडमिनिस्ट्रेटीव्हचा जॉब असल्याचे सांगून त्यासाठी कोणतीही फी अथवा हिडन चार्जेस द्यावे लागणार नसल्याचे त्यांना सांगितले. तसेच त्यांना फक्त 10 रुपये टोकन भरावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून 10 रुपये भरण्याची तयारी दर्शवली. तासाभरानंतर दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांना संपर्क साधून त्यांना 10 रुपये ट्रान्सफर करण्यासाठी ग्रेडनोकरी डॉट इन या ॲपवर जाण्यास सांगून त्यातील जॉईन नोकरी यावर क्लिक करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी 10 रुपये पाठवण्यासाठी नेट बँकिंगचा वापर करून त्यात ओटीपी टाकल्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून 34 हजार 800 रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळते झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यातदेखील तक्रार दाखल केली.

Exit mobile version