अनिल देशमुखांच्या जामीनावर निर्णय घ्या – सर्वोच्च न्यायालय

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने मुंबई उच्च न्यायालयाला दिलेले आहेत. न्या.धनंजय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने 21 मार्चपासून अनिल देशमुख यांची जामीन याचिका प्रलंबित असल्याची नोंद घेतली.

जामीन अर्ज दाखल करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला आपली याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल, अशी कायदेशीर अपेक्षा असते. जामीन याचिका प्रलंबित ठेवणं कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही, असे खंडपीठाने सांगितले.

आम्ही एक निर्देश जारी करत असून याचिकाकर्त्याला ज्या न्यायमूर्तींकडे खटला सोपवण्यात आला आहे त्यांच्यासमोर अर्ज करण्याची परवानगी देतो. हा अर्ज याच आठवड्यात सुनावणीसाठी घेतला जाईल आणि त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असं खंडपीठाने स्पष्ट केलं. दरम्यान न्यायालयाने या प्रकरणावर इतर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयात एन जे जामदार यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

Exit mobile version