दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार द्या!

विविध मागण्यांसाठी शेकापचा बैलगाडी मोर्चा; मागण्यांचा विचार न झाल्यास चक्काजामचा मोहन गुंड यांचा इशारा

| केज | प्रतिनिधी |

पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके करपली, उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता मावळली आणि 2025 चा खरीप-रब्बी पीकविमाही अद्याप प्रलंबित आहे. या संकटात शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असताना शासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीने ठोस मदत द्यावी, दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत, प्रलंबित पीकविमा तातडीने अदा करणे, वीजबिल माफ करणे आणि शेतीपंपांना किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करावा, जनावरांसाठी चाऱ्याची तातडीने व्यवस्था करण्यात यावा, या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने सोमवारी (दि. 21) केज तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढला.

आंबेडकर चौकातून वाजतगाजत, शासनविरोधी घोषणांनी हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात परिसरातील शेतकरी बैलगाड्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपली असून, शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. मोर्चादरम्यान करपलेल्या पिकांची होळी करून शासनाच्या शेतकरी धोरणांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. घोषणा देत तहसील कार्यालयावर पोहोचलेल्या आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.

यावेळी शेकाप राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई मोहन गुंड यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की, बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी. 2025 चा प्रलंबित पीकविमा द्यावा, वीजबिल माफ करावे आणि शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा करावा. शासन दरबारी आमच्या मागण्यांचा तातडीने विचार झाला नाही, तर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल. शेकापचे बीड जिल्हा चिटणीस ॲड. नारायण गोले पाटील आणि भाई बापूसाहेब सोळुंके यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी हनुमंत भोसले, डॉ. हनुमंत सौदागर, प्रकाश भन्साळी, राहुल खोडसे, राष्टपाल पाटुळे, अक्षय भुंबे, शेकाप महिला आघाडीच्या शिवकन्या गुंड, सविता आकुसकर, भाई अशोक रोडे, शंभुराजे पाटील, ॲड. निखिल बचुटे, हभप अशोक महाराज, मंगेश देशमुख, महेश गायकवाड, बालु भासले, दिगंबर मगर, धनराज भासले, दिनकर बप्पा कदम, अनिल नखाते, विनोद आगलावे, किशोर सुरवसे, मुस्तक शेख, गोविंद गुंड, दादा हास्वले, बाबुराव जाधव, दिगाबर गुंड यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

काय आहेत प्रमुख मागण्या?
बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी., जनावरांसाठी तात्काळ चारा उपलब्ध करून द्यावा., सन 2025 च्या खरीप व रब्बी हंगामाचा प्रलंबित पीकविमा तातडीने वितरित करावा., शेतीपंपांचे तसेच घरगुती वीजबिल संपूर्ण माफ करावे., शेतीपंपांसाठी किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करावा., शेतकऱ्यांवर स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ बंद करावी., बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करावा., केज शहरातील शेतकऱ्यांनाही ग्रामीण कृषी योजनांचा लाभ द्यावा.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. प्रत्यक्ष निर्णय घेऊन मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचवावी. मागण्यांचा तातडीने विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करुन शेतकऱ्यांच्या रोषाला आणि आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल.

भाई मोहन गुंड
Exit mobile version