दुधाच्या दरात घसरण


| मुंबई | वृत्तसंस्था |

कोरोनापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्यात जवळपास ठप्प आहे. दूध पावडर, बटरचे साठे पडून आहेत. अन्य राज्यांतून आणि डेअरींकडून असलेली मागणीही ठप्प झाली आहे. प्रक्रिया प्रकल्पांकडून दुधाला मागणी नसल्याच्या या काळात दूध उत्पादनात 15 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होऊन दूधाचे दर घसरले आहेत. गोवर्धन डेअरीचे प्रमुख प्रीतम शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या टाळेबंदीपासून राज्यातून दूध पावडर, केसीन, बटर आणि चीज या दुग्धजन्य पदार्थांची निर्यात विस्कळीत झाली आहे. राज्यभरातील दूध प्रक्रिया प्रकल्पांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे साठे पडून आहेत. त्यामुळे प्रक्रियादारांकडून दुधाला असलेली मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्र दूध उत्पादनातील आघाडीवरील राज्य असल्यामुळे केरळ दूध फेडरेशन, बिहार दूध फेडरेशन, दिल्ली या राज्यांतून आणि मदर डेअरीसारख्या मोठ्या प्रक्रियादारांकडून दुधाला मागणी असते. आता देशाच्या त्या-त्या भागात अपेक्षित दूधउत्पादन होत असल्यामुळे राज्यातील दुधाला असलेली मागणीही ठप्प झाली आहे. दुधाला मागणी कमी असण्या राज्यातील दूध उत्पादनात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण होऊन दुधाचे दर कोसळले आहेत.

गाईच्या दुधाला 26 ते 32 रुपये दर

राज्य सरकारने गाईचे दूध 34 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा आदेश खासगी आणि सहकारी दूध संघांना दिला आहे. तरीही राज्यात सर्रास गाईच्या दुधाची खरेदी 26 ते 32 रुपये प्रतिलिटर दराने सुरू आहे. राज्यात दैनंदिन सरासरी एक कोटी 90 लाख लिटर दूधउत्पादन होते. त्यात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होऊन दूधसंकलन दोन कोटी 15 लाख लिटरवर गेले आहे. दुधाला मागणी नसण्याच्या काळात अतिरिक्त दूध उत्पादनामुळे गाईच्या दुधाचे दर कोसळले आहेत.

Exit mobile version