दीपोत्सवाचे रायगडात उत्साहात स्वागत

फटाक्यांची आतषबाजी, पणत्यांच्या प्रकाशांनी आसमंत उजळला

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

लखलखत्या पणत्यांच्या प्रकाशात, फटाक्यांच्या आवाजात रायगडात दीपोत्सवाचा सोहळा अमाप उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक ठिकाणी दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.

सोमवारी नरक चतुर्दशीच्या निमित्ताने अभ्यंगस्नानाने दीपोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेच्या सुखद गारव्यात कुटुंबासमवेत दीपावलीचा आनंद लुटण्यात सारेजण मग्न असल्याचे दिसून आले. दारात काढलेल्या सुबक रांगोळ्या, सभोवताली करण्यात आलेली दिव्यांची देखणी आरास यामुळे प्रत्येक घर उजळून निघाले होते. अभ्यंगस्नानानंतर घरीच बनविलेला खमंग फराळ सामूहिकरित्या खाताना झालेला आनंदही प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता. त्यात आदल्या दिवशीच टीम इंडियाने पाकिस्तानवर मिळविलेल्या थरारक विजयाने यावेळच्या दिवाळीचा आनंद आणखी द्विगुणीत झाल्याचे दिसत होते. फराळ खातानाही काय मस्त झाली कालची मॅच, पाहिली की नाही. विराट जबरदस्त खेळला अशा कॉमेन्टस प्रत्येकाकडून व्यक्त केल्या जात होत्या.

अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी दिवाळी पहाट हा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमांनाही नागरिकांनी उत्स्फूर्त अशी गर्दी केली होती. तेथेही चर्चा केवळ विराटचीच होत राहिली.

लक्ष्मीपूजन उत्साहात
सायंकाळी घरोघरी आणि दुकानांमध्ये लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. लक्ष्मीपूजनानंतर जोरदार आतषबाजीने सारा आसमंत दणाणून गेला होता.

Exit mobile version