पाच दिवसांत काम पूर्ण करा, अन्यथा काळं फासू; चित्रलेखा पाटील यांचा इशारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पुलाचे काम अद्याप अपूर्ण असतानाच नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला पर्यायी बंधारा पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेला. परिणामी, देहेन आणि भाकरवड या दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी गुरुवारी (दि.25) घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ज्यांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत, अशा राम आणि लखन या ठेकेदारावर जोरदार टीका केली.
पाच दिवसांच्या आत पर्यायी पुलाची किंवा वाहतुकीची सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा शेकापच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच लोकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासण्यासही आम्ही मागे-पुढे पाहणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी यावेळी घेतला.
कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. पुलाचे काम रखडले, पर्यायी बंधाराही वाहून गेला, मग जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत चित्रलेखा पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा निषेध केला. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी कारभाराला शेकाप कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देहेन-भाकरवड हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत आहे. या गावाला जोडणारा पूल शासनाच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती प्राप्त झाली. या पुलाचे काम सप्टेंबरपासून सुरू झाले. पर्यायी पूल बांधून देण्यात आला होता. मात्र, दहा महिने होत आले, तरी पुलाचे काम पूर्ण झाले नाही. मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसात बुधवारी सकाळी पर्यायी पूल वाहून गेला. त्यामुळे शाळकरी मुलांसह वयोवृद्ध नागरिक, महिलांचे प्रचंड हाल झाले. दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याचा त्रास नागरिकांना झाला. ही बाब शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. तेथील ग्रामस्थ, महिलांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यांची समस्या जाणून घेतली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करीत चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, या पुलाचे काम अद्याप झाले नाही. त्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे. रुग्णांना कसे न्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडाली. या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर सुरु असलेल्या पुलाच्या कामाची माहिती घेतली. सप्टेंबरमध्ये कार्यादेश असताना दहा महिन्यांत काम का पूर्ण झाले नाही, असा संतापजनक सवाल चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला.
यावेळी अलिबाग तालुका सह चिटणीस नरेश म्हात्रे, अनिल पाटील, विलास म्हात्रे, विजय पाटील, कौशिक पाटील, मोरा गुरुजी, दिगंबर म्हात्रे, निलेश चवरकर, विक्रांत वार्डे इतर मान्यवर, ग्रामस्थ शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लखन'च्या मागचा ‘राम' कोण?
हिंदी चित्रपटातील ‘राम-लखन'ची जोडी सर्वांनाच माहिती आहे. सध्या देहेन-भाकरवड पुलाच्या कामानिमित्त अशाच एका ‘राम-लखन' जोडीची चर्चा परिसरात रंगली आहे. या पुलाचे काम लखन नामक ठेकेदार करीत असल्याची माहिती आहे. परंतु, मुख्य ठेकेदार वेगळाच आहे. वाहून गेलेल्या पुलाची जबाबदारी घेण्याऐवजी, लखनच्या मागे उभे राहण्याऐवजी हा राम मैदान सोडून पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे हा ‘राम' म्हणजेच मुख्य ठेकेदार नक्की आहे तरी कोण? यावर चर्चांना उधाण आले आहे.
चित्रलेखा पाटील,
देहेन-भाकरवडच्या नागरिकांना वेठीस धरण्याचा अधिकार कोणालाही नाही. पुलाचे काम दहा महिने रखडले, पर्यायी बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेला आणि दोन गावांचा संपर्क तुटला. हा केवळ निष्काळजीपणा नसून, नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. पाच दिवसांत सुरक्षित पर्यायी व्यवस्था उभी राहिली नाही तर शेकाप रस्त्यावर उतरेल. जबाबदार अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
प्रवक्त्या, शेकाप
