वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब

इच्छुकांमध्ये नाराजी, अंतर्गत संघर्षाची चर्चा

| माथेरान | प्रतिनिधी |

नगरपरिषदेच्या निवडणुकांनंतर चार महिने उलटूनही वनसमितीची नवीन कार्यकारिणी जाहीर न झाल्याने माथेरानमध्ये इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अध्यक्षपदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुकांनंतर दर पाच वर्षांनी वनसमितीची कार्यकारिणी जाहीर केली जाते. मात्र यंदा सत्ताधारी सभागृहात स्थिरावल्यानंतरही चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला असतानाही समितीची घोषणा झालेली नाही. यामुळे समितीत स्थान मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांचा भ्रमनिरास होताना दिसत आहे.

वनसमितीच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळेच कार्यकारिणी जाहीर करण्यात विलंब होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या समितीकडे दस्तुरी नाक्यावरील वाहन कराच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न जमा होते. मात्र, कार्यकारिणीच अस्तित्वात नसल्याने या निधीच्या जमा-खर्चाचा हिशोब आणि नियोजन करणे कठीण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या नगरपरिषदेच्या तिजोरीत निधीअभावी विकासकामे रखडलेली असताना वनसमितीकडे सुमारे 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध असल्याची चर्चा आहे. या निधीचा योग्य वापर केल्यास पर्यटनवाढ, पर्यावरण संवर्धन आणि माथेरानच्या विकासासाठी मोठी कामे हाती घेता येऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे. वनसमितीत सदस्यत्वासाठी अनेक इच्छुक पुढे सरसावत असल्याने या समितीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. त्यामुळे कार्यक्षम, पर्यावरणाबाबत जागरूक आणि पर्यटनवाढीसाठी काम करू शकणाऱ्या व्यक्तींनाच समितीत संधी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. तसेच निवडणूक काळात सक्रियपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, अन्यथा ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर वनसमितीची कार्यकारिणी जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version