260 हून अधिक एसटी सीएनजीवर; महामंडळाचे प्रवासी आणि पर्यटक त्रस्त
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
डिझेलच्या जागी आता सीएनजीवर चालणाऱ्या एसटी बसेस रस्त्यावर धावत आहे. मात्र, सीएनजी गॅस भरण्यासाठी अलिबाग स्थानकात विलंब होत असल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रवाशांना स्थानकात एसटीची ताटकळत वाट पहावी लागत आहे.
यापुर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस डिझेलवर चालत होत्या. परंतु, गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील एसटी बसेस सीएनजीवर चालविण्यावर भर देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात 430 हून अधिक एसटी बसेस आहेत. यापैकी 260 हून अधिक एसटी बसेस सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. जिल्ह्यातील अलिबागसह पेण, महाड या बस आगारात सीएनजी पंपाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात सीएनजीवर चालणाऱ्या एसटी बसवर भर देण्यात आला आहे. अलिबाग, पेण, महाड या एसटी बस आगारात सीएनजी गॅस पंप उभारण्यात आले आहे. जिल्हयात सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे 260 एसटी बसेस आहेत. डिझेलची जागा आता सीएनजीने घेतली आहे. मात्र, गॅस भरण्यासाठी विलंब होत असल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मुरूड आगारातील एसटी बसेस अलिबाग एसटी बस आगारात सीएनजी गॅस भरण्यासाठी येतात. त्यामुळे बसमधील प्रवाशांना गॅस भरण्यासाठी पुन्हा बसमधून उतरावे लागते. गॅस भरण्यासाठी अर्धा तासाहून अधिक कालावधीत होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. उन्हाचे चटके बसत आहेत. बसची वाट पाहण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाशांना उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची भिती आहे. त्याकडे मात्र एसटी महामंडळाचे दूर्लक्ष असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न यातून निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
