अवकाळीमुळे मीठ उत्पादन लांबणीवर

| मुंबई | वृत्तसंस्था |

मीठ उत्पादन होण्याचा हंगामाला प्रारंभ होताच वसई-विरार भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा परिणाम हा सर्वच क्षेत्रावर झाला असून त्याचा परिणाम वसईच्या पारंपारिक व्यवसाय असलेल्या मीठ उत्पादनावर झाला आहे. मीठ उत्पादन करण्याचे काम आता महिनाभर लांबणीवर पडले आहे. वसई विरार भागातील मीठ उत्पादन हा पारंपारिक व्यवसाय आहे. एकेकाळी हा व्यवसाय अधिक जोमाने सुरु होता पंरतु विविध प्रकारच्या निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे हा व्यवसाय अडचणीत सापडत आहे. असे असतानाही वसईच्या भागात काही मीठ उत्पादन मीठ पिकवीत आहेत.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून वसईच्या मिठागरात चोपणे, पाणी जमा करणे, त्याची योग्य ती डिग्री तयार करणे अशा मीठ पिकविण्यासाठीच्या विविध प्रक्रियांच्या कामाला सुरवात होत असते. काही भागात मजुरांना बोलावून कामही सुरू केले होते. त्यातच रविवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. यामुळे यावर्षी सुद्धा मीठ पिकविण्याचे काम लांबणीवर गेले आहे. जवळपास 20 दिवस ते एक महिना हे काम लांबणीवर पडणार असल्याने निघणाऱ्या वार्षिक उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे मीठ उत्पादकांनी सांगितले आहे.

मीठ उत्पादनाची मुख्य सुरवात करण्याच्या कामाच्या वेळीच अवकाळी पाऊस कोसळला आहे. आता सर्व कोंड्यामध्ये पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मीठ पिकविण्याचे काम हे महिनाभर उशिराने सुरू होईल. उशीर होणार असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

हेमंत घरत, मीठ उत्पादक
डिग्री तयार होण्यास अडचणी
वाढत्या शहरीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी हे खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे खाड्या प्रदूषित होऊन सुरवातीला पाण्याचा जो खारट पणा आहे तो कमी झाला आहे. त्यामुळे मीठ तयार होण्यासाठी आवश्यक डिग्री तयार करावी लागते त्यातही आता अडचणी येत आहेत, असे मीठ उत्पादक व्यावसायिकांनी सांगितले आहे.
Exit mobile version