| दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. हा आम आदमी पक्षाला सर्वात मोठा धक्का आहे.100 कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ईडीची टीम 10 वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री 9च्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी पक्षातील भगवंत मान, आतिशी, सौरभ भारद्वाज या बड्या चेहऱ्यांवर पडणार आहे. अशातच आपचे खासदार राघव चढ्ढा डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी ब्रिटनला गेले आहेत. अशा स्थितीत यावेळी त्यांनाही पंजाबमधील निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही. राघव चढ्ढा यांनी विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली होती आणि पक्षाला जोरदार विजय मिळवून दिला होता. अशा परिस्थितीत पंजाबमधील ‘आप’चा मोठा चेहरा बघितला तर फक्त मुख्यमंत्री भगवंत मान उरले आहेत.
मुख्यमंत्री मान यांचा भाजपवर हल्लाबोल मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, ईडी ही भाजपची राजकीय टीम आहे. केजरीवालांच्या विचारसरणीला भाजप कैद करू शकत नाही कारण फक्त आम आदमी पार्टीच भाजपला रोखू शकते. विचार कधीही दाबता येत नाही.