एनएमएमटी चालक वाहकावर कारवाईची मागणी


| पनवेल | वार्ताहर |

करंजाडे ते पनवेल रेल्वेस्टेशन चालणाऱ्या एनएमएमटीच्या बसचालक वाहकाने लहान मुलांसह धावत थांबलेल्या बसमध्ये येणाऱ्या महिलेला गाडीत न घेता सोबतच्या दोन महिलांना मुलांसह जबरदस्तीने खाली उतरवले. या चालक, वाहकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पनवेल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ यांनी केली आहे. करंजाडे सेक्टर 6 येथून पनवेल रेल्वेस्टेशनला जाणारी 76 नंबरची बस क्रमांक एमएच 43 बीपी 0012 सेक्टर 6मधील सुरुवातीच्या स्टॉपवरून निघत असताना एका व्यक्तीने गाडी सुरू करू नका, महिला मुलांना घेऊन धावत येत आहेत, सांगितल्यावर दोन महिला आणि तीन मुले धावत येऊन गाडीत बसले. त्यांच्या पाठोपाठ एक महिला लहान मूल हातात घेऊन धावत होती. ती गाडीजवळ येताच चालकाने गाडी सुरू केली. गाडीतील महिला गाडी थांबवा तिला येऊ द्या म्हणून ओरडत होत्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून गाडी पुढे नेली..

या महिलेने ती आमच्या बरोबर आहे, असे सांगितल्यावर वाहकाने त्यांना सेक्टर 5मधील बसस्टॉपवर नेऊन उतरवले आणि तुमच्या सोबतची महिला आल्यावर दुसऱ्या गाडीतून तुम्ही या, असे सांगितले. याबाबत एका प्रवाशाने वाहकाला विचारले असता, गाडी लेट आहे. आम्ही असे किती जणांना घ्यायचे असे उत्तर दिले. अशा मी बेपर्वा चालक, वाहकावर कारवाई करण्याची मागणी पनवेल प्रवासी संघटनेने केली आहे.

सेक्टर 6 मध्ये बसचा सुरुवातीचा स्टॉप होता. लहान मूल हातात घेऊन धावत येणाऱ्या महिलेसाठी गाडी न थांबविणे तसेच सोबतच्या महिला व मुलांना रस्त्यात उतरवणे योग्य नसल्याने त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे इतरांना जरब बसेल.


-ॲड. मनोज भुजबळ,अध्यक्ष पनवेल प्रवासी संघटना


Exit mobile version