प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात भटक्या कुत्र्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली असून शुक्रवारी दुपारी करंजाडे वसाहत व गावातील चार महिलांचे भटक्या कुत्र्याने लचके तोडले. यावेळी त्या महिलांना उपचारकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या संदर्भात संबधीत विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी केली आहे.
करंजाडे वसाहतीचे नागरिकरण मोठया प्रमाणात वाढत असून सिडकोचा मोठा परिसरात या महसुली विभागात येतो. पुर्वी घर आणि शेतीचे राखण करण्यासाठी प्रत्येक घरी कुत्रे पाळले जायचे. हा प्राणी अतिशय प्रामाणिक असून तो रखवालदाराची भुमिका पार पाडीत असे. मात्र नागरीकरणाचा कक्षा रूंदावल्याने शेती व्यवसाय जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आता कुत्रे पाळण्याचा कलही कमी झाला आहे. ज्यांना कोणाला आवड आहे ते विदेशी प्रजातीचे कुत्रे पाळता मात्र देशी कुत्रे आता निराधार झाले आहेत. परिणामी दिवसेदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून त्यांचे निर्बिजीकरण होताना दिसत नाही.
शहरी भागाचा विचार करता याबाबतीत तात्काळ कार्यवाही केली जाते. मात्र ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात मात्र निर्बिजीकरणाची सोय नसल्याने भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. परिणामी उपद्रव्य मुल्य कमी होत नाहीच त्याचबरोबर त्यांची संख्याही नियंत्रणात आणता येत नाही. या कारणामुळे पनवेल तालुक्यात विशेषतः करंजाडे, वडघर ग्रामपंचायत हद्दीत कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून या परिसरातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असून त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाही. शुक्रवारी दुपारच्या वेळेस चार महिला आपल्या कामानिमिताने घराच्या बाहेर पडल्या असतानाच एक भटका कुत्रा या महिलांच्या अंगावर येत काही क्षणातच त्या महिलांचे लचके तोडले. मात्र नागरिकांनी धाव घेतल्यावर तो कुत्रा पळाला, या महिलांवर उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या भटक्या कुत्रांवर तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक रहिवा शासह ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सिडकोकडे केली आहे.
करंजाडे वसाहत तसेच वडघर परिसरातील गावामध्ये भटक्या कुत्रांची दहशत वाढली आहे. यामध्ये वाहनचालकांच्या अंगावर धावत आहेत, तर काही कुत्रे दिसेल त्यांचा चावा घेत आहेत. या भटक्या कुत्र्यांवर सिडको विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करावेत.
रामेश्वर आंग्रे, सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत
करंजाडे वसाहत हद्दीमध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्रांची दहशत वाढत चालली आहे. दुपारच्या सुमारास महिलांना भक्या कुत्र्याने चावा घेतला आहे. यावर संबंधित विभागाने उपाययोजना करावेत.
सई पवार, महिला विभाग संघटक, शिवसेना करंजाडे