| पनवेल | वार्ताहर |
बाल कामगार ठेवणे गुन्हा असूनदेखील पनवेल परिसरात सर्रास बाल कामगार ठेवले जात आहेत. पनवेलमधील सामाजिक संस्था पत्रकार मित्र असोसिएशन यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने आणि कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर समता केंद्र समाजसेवी संस्थेला साक्षी ठेवून सदर तक्रारीबाबत त्यांनी संलग्न कारवाई केली.या कारवाईमध्ये पनवेलमधील मिरची गल्ली येथे असलेल्या शंकर बेकरीमध्ये अवैधरित्या काम करणार्या बाल कामगारांना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी या बाल कामगारांना कामावर ठेवणारे बेकरीचे मालक मुरली वध्यमल लालवाणी यांची चौकशी सुरु आहे. या मालकाने या कामगारांना अवघ्या 9 हजार रुपयांच्या पगारावर बेकरीतील पाव ट्रेमध्ये भरून नंतर ते भाजून झाल्यानंतर तेच पाव पॅकिंग करण्यासाठी नेमले होते. सदर कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जवरे, महिला पोलीस शिपाई कोकणे, कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी कामगार अधिकारी सौ. स्नेहल सुभाषचंद्र माटे, दुकाने निरीक्षक गजानन जोंधळे आणि बालकामगार जिल्हा स्तरीय कमिटीमधील सदस्या तसेच समता केंद्र समाजसेवी संस्थेच्या सौ.स्मिता शैलेश काळे यांच्या पथकाने केली आहे. यावेळी बाल कामगार ठेवणे हा गुन्हा असून व्यापार्यांनी याचे भान ठेवावे आणि समाजातील गरजू मुलांना काम देण्यापेक्षा त्यांना थोडी का होईना पण त्यांच्या शिक्षणासाठी काही मदत करण्याचे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी केले आहे.