। पनवेल । वार्ताहर ।
युवासेना उत्तर रायगड, पनवेल आणि उरण विधानसभा पदाधिकार्यांकडून पनवेल पोलीस उपआयुक्तांना ड्रग्ज आणि नशायुक्त अमली पदार्थ विरोधात कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
पनवेल, खारघर, उरण आणि रायगड जिल्ह्यालगत असणार्या शहरी आणि ग्रामीण भागात सर्रास विकल्या जाणार्या गांजा, चरस, एमडी तसेच इतर अंमली पदार्थांसंदर्भात युवासेना उत्तर रायगड पनवेल विधानसभा तसेच उरण विधानसभा पदाधिकार्यांकडून पनवेल पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अवैध रित्या गांजा आणि नशेचे पदार्थ विकणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, अवैध नशेचे पदार्थ विकणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त यांनी दिले आहेत. यावेळी रुपेश पाटील, रामदास शेवाळे तसेच युवासेना पनवेल आणि उरण विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.






