नवी मुंबई महापालिकेचे जिल्हा परिषदेला पत्र
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत नळजोडणी केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विंधणे व देवद ग्रामपंचायतींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई महापालिकेने रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या स्वाक्षरीने पत्र पाठविण्यात आले.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 2050 मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर विंधणे आणि देवद ग्रामपंचायतींकडून सुमारे 100 मि.मी. व्यासाची संयुक्त अनधिकृत नळजोडणी करण्यात आली होती. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता अनधिकृत जोडणी आढळून आली.
महापालिकेकडून 21 ऑगस्ट 2025 रोजी रात्री कारवाई करत ही अनधिकृत नळजोडणी तोडण्यात आली होती. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्यातही अहवाल सादर करण्यात आला होता. तसेच संबंधित ग्रामपंचायतींना जलचोरीप्रकरणी दंडात्मक शुल्क आकारण्यात आले असून, सुमारे 60 लाख रुपयांहून अधिक रकमेची मागणी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, वारंवार सूचना देऊनही संबंधित ग्रामपंचायतींकडून दंडाची रक्कम भरली गेलेली नाही. एवढेच नव्हे तर 1 मे 2026 रोजी पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने पुन्हा पोलीस बंदोबस्तात कारवाई करून जोडणी खंडित केली.
दरम्यान, संबंधित ग्रामपंचायतींकडून अद्यापही पिण्याच्या पाण्याचा वापर सुरू असल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. त्यामुळे विंधणे आणि देवद ग्रामपंचायतींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या प्रकारामुळे मोरबे जलवाहिनी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
