| रसायनी | प्रतिनिधी |
राज्यात पाणीटंचाईचे संकट असताना पाताळगंगा नदीतून अनधिकृतरीत्या पाणी उपसा करून त्याची व्यावसायिक विक्री केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या कथित पाणीचोरीची सखोल चौकशी करून पाणी उपसा करणाऱ्या टँकरचालकांसह संबंधित व्यक्ती व कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच, या प्रकाराला कोणाचा वरदहस्त आहे आणि दोषींना कोण अभय देत आहे, याचाही शोध घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभाग अध्यक्ष राकेश खराडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याच्या पाटबंधारे विभागासह जिल्हा पाटबंधारे विभाग, कर्जत पाटबंधारे विभाग आणि खालापूर तहसीलदारांकडे कारवाईची मागणी केली आहे. रसायनी आणि पाताळगंगा औद्योगिक परिसरासाठी पाताळगंगा नदी हा महत्त्वाचा जलस्रोत आहे. या नदीच्या पाण्यावर परिसरातील नागरिक, शेतकरी आणि विविध घटक अवलंबून आहेत. मात्र, नदीतून पाणी उपसा करून टँकरद्वारे त्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारींमुळे जलसंपत्तीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पाण्याचा उपसा करणाऱ्यावर कारवाईची मागणी
