। उरण । वार्ताहर ।
मत्स्यविभागाला वाळवी लागून भ्रष्टाचारांनी पूर्णपणे पोखरली गेली आहे. याबाबत अनेकवेळा लेखी तक्रारी होऊनही कारवाई करण्यास आयुक्त अतुल पाटणे हे अपयशी ठरत असल्याचे उघड होत आहे. यामुळे मच्छीमार बांधवांना न्याय देण्यासाठी व भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मत्स्यविभागाच्या सचिवपदी लोकप्रिय कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
1 जून पासून मासेमारीस बंदी असतानाही उरणमधील करंजा बंदरातून मासेमारी सुरू आहे. याची माहिती अधिकारी वर्गांना दिल्यावर ते मी एक महिला अधिकारी असूनही माझ्या परीने कारवाई करते याचा विचार करावा, अशी उत्तरे देत आपली बाजू सुरक्षीत करण्याचा प्रयत्न करतात. तसेच, बोटींच्या नंबरवर कलर लावला जातो अथवा खोटे नंबर लावून मासेमारी केली जाते. यामुळे दहशतवादी कारवाया घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा संशय व्यक्त केला. अलिबाग व उरणमधील मत्स्यविभागाचे अधिकारी वर्ग हे आम्हीं अनेक बोटींवर कारवाई केल्याचे सांगतात. पण याची कधीही प्रेसनोट काढली जात नाही. तसेच, आजतागायत बोटींवर कारवाई झाली असेल तर या बोटींवरील जप्त केलेली लाखों रुपयांची मासळी गेली कुठे, याची माहिती कधी जाहीर होत नाही. तसेच, या बोटींना बर्फ व डिझेलची खुलेआम विक्री होत असताना त्यांच्यावरही कधी कारवाई अथवा गुन्हे दाखल झालेले नाहीत. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मत्स्यविभागाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.







