खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरणाची मागणी

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन नगर परिषदेने मागील वर्षी पावसाळा संपल्यानंतर शहरातील जुन्या झालेल्या जलवाहिल्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले होते. नवीन जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर शहरातील बहुतांश भागातील खोदकाम केलेल्या रस्त्यावरती डांबरीकरण करण्याचे काम पूर्ण झाले होते. परंतु पावसाळा सुरू झाल्यामुळे शहरातील बऱ्याचशा भागात डांबरीकरण करणे अपूर्ण राहिलेले आहे.

अपूर्ण राहिलेल्या डांबरीकरण कामामुळे शहरातील नागरिकांना तसेच येणाऱ्या पर्यटकांना रस्त्यावर टाकलेल्या खडीचा वाहन चालवताना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. खडीवरून अनेक दुचाकीस्वार घसरण्याच्या घटना घडत असतात. आता पावसाळा जवळजवळ संपल्यात जमा असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्या देखील वाढू लागली आहे. सध्या नियमित प्रमाणात पर्यटक येत नसले तरी, शनिवार, रविवारी या ठिकाणचा स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा पाहण्यासाठी तसेच पेशव्यांची जन्मभूमी पाहण्यासाठी पर्यटक श्रीवर्धन शहरात येत असतात. तरी नगरपरिषदेने अपूर्ण राहिलेले डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

नुकताच पावसाळा संपलेला असल्यामुळे अनेक ठिकाणचे डांबर प्लांट सुरू झालेले नाहीत. डांबरीचे प्लांट सुरू झाल्यानंतर अर्धवट राहिलेले डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. तसेच लवकरात लवकर जलशुद्धीकरण प्रकल्प देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.

विराज लबडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक, श्रीवर्धन नगरपरिषद, श्रीवर्धन
Exit mobile version