गुढीपाडव्या पार्श्‍वभूमीवर बांबूला मागणी

| सुधागड-पाली | वार्ताहर |

टिकाऊ, लागवडीचा अल्प खर्च, कमी मशागत, कमी वेळात अधिक उत्पादन आणि उत्पन्न देणार्‍या बांबूच्या लागवडीकडे अनेकजण वळत आहेत. गुढी उभारण्यासाठी बांबूच्या काठ्यांची विक्री सुरू झाली आहे. त्याचबरोबरच बांधकाम व्यवसाय, मांडव उभारणी, विविध शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी बांबूला मागणी वाढली आहे. याशिवाय पनवेल व मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळ असल्याने ठिकठिकाणी शास्त्रशुद्धरीत्या बांबू लागवड होत आहे.

पालीतील रवींद्र लिमये यांनी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली आहे. गुढीपाडव्यानिमित्त बांबू विक्रीही सुरू आहे. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर हे बांबूपासून इको फ्रेंडली घरे तयार करतात आणि याचे प्रशिक्षणही देतात. त्याचबरोबर सुधागड तालुक्यातील गोंदाव माठळ येथील शेतकर्‍यानेही बांबूची लागवडीला पसंती दिली आहे. सुधागड तालुक्यातील ढोकशेत येथे सचिन सूर्यकांत टेके व प्रतीक्षा सचिन टेके यांनी साडेचार एकर क्षेत्रामध्ये ङ्गबांबूविश्‍वफउभारले आहे. याठिकाणी एकूण 1300 हून अधिक बांबूची लागवड करण्यात आली असून मुख्यत्वे माणगा ही प्रजाती व इतर 34 अनेकविध प्रजातींचे बांबू आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी, बांबू लागवडीकडे वळावे यासाठी टेके निःशुल्क बांबू लागवड परिसंवाद आयोजित करतात. त्यांच्याकडे माणगा जातीचे 4000 रोपे, टुल्डा जातीची 3500 विविध प्रजातींची बांबूची रोपे उपलब्ध आहेत.

पनवेल, मुंबई मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या बांबूला 70 ते 80 रुपये दर मिळतो. लागवडीनंतर चार वर्षांनी बांबू तोड केली जाते. लागवडीच्या वर्षी खर्च जास्त येतो, यात रोपांचे पैसे, खड्डे खोदणे, तण काढणे व रोपे लावणे या सर्व कामासाठी मजुरी व खतांच्या खर्चाचा समावेश आहे. दुसर्‍या वर्षापासून केवळ तण काढण्यासाठी मजुरी आणि खतांचा खर्च येत असल्याचे बांबूविश्‍वच्या टेके यांनी सांगितले.

बांबूचे अनेक उपयोग
बांबुच्या विविध प्रजाती कोकणात उत्तम प्रकारे वाढतात. नवनवीन बांबू उद्योग सध्या येऊ
घातले आहेत. पर्यटनासाठी बांबूची घरे, बांबू फ्लोरिंग, बांबू पॅनल, अगरबत्ती, हस्तकला, चारकोल, इथेनॉल आदी साठी बांबू वापरला जातो.
माणगा बांबूला पसंती
बांबूच्या विविध प्रजाती असून यात माणगा बांबूला अधिक पसंती आहे. हा बांबू भरीव तसेच लवचिक असतो. या बांबूची विक्री मोठ्या प्रमाणात होते. जाड काठीची किंमतही जास्त मिळते. वर्षभर या बांबूला मागणी असते. टोपल्या, फावडे, फर्निचर, हातोडे तयार करण्यासाठी तसेच बांधकाम व्यवसायात त्याचा प्रामुख्याने वापर होतो.

बांधकाम व मांडव व्यावसायिक तसेच परांचीसाठी मोठ्या प्रमाणात बांबू खरेदी करतात. गुढीपाडव्यानिमित्त बांबूंना मागणी वाढली असून 80 ते 80 रुपये नग दराने विक्री सुरू आहे. बांबू लागवडीतून चांगले उत्पन्न मिळते.

शंतनू लिमये,
बांबू उत्पादक, पाली


बांबू लागवडीकडे वळणार्‍यांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जाते. आपल्याकडील हवामान बांबू लागवडीसाठी चांगले आहे. रोगराई कमी व देखभाल खर्च कमी असल्यामुळे अनेक शेतकरी याकडे वळले आहेत. पडीक जमीन माळरान आणि कमी पाण्यातही लागवड करता येते. त्यामुळे अनेकजण बांबूची रोपे घेण्यासाठी येतात.

अमित निंबाळकर,
नर्सरीचे मालक
Exit mobile version