रब्बीचे भात खरेदी करण्याची मागणी

| आगरदांडा | वार्ताहर |
रब्बी हंगामात भात पिकविणार्‍या शेतक-यांना भात खरेदी केंद्रावर विक्रीची परवानगी मिळावी, अशी मागणी मुरुड तालुक्यातील शेतकर्‍यांनी सरकारकडे केली आहे. उंडरगावचे मदन भोईर, खार अंबोलीचे चंद्रकांत कमाने, बोर्लीचे गजानन दिवेकर, महाळुंगेचे शशिकांत पारवे, प्रमोद मेहेतर, जोसरांजणचे जगन पाटील, शिघ्रे येथील संतोष माळी आदी शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील भात खरेदी करण्याविषयी विनंती केली आहे. भात पुढच्या हंगामापर्यंत विक्री होईलही परंतु सद्य:स्थितीत आर्थिक ओढाताण होत असल्याचे सांगितले.

खार आंबोलीचे भात खरेदी संचालक दिनेश मिनमिणे यांनीदेखील बोनसच्या रक्कमेविषयी शेतकरी वर्गाकडून विचारणा होत असल्याने बोनस जाहीर करून रक्कम देण्याची मागणी केली आहे. शासनाकडून प्रति क्विंटल 700 रु. प्रमाणे दिला जाणारा बोनस देण्यास राज्य शासनाने नकार दिल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. महागाई, वाढती मजुरी, अवकाळी पाऊस यामुळे भातशेती ही तोट्याची ठरली असताना शासनाकडून दिला जाणार्‍या बोनस रक्कमेमुळे बळीराजाला दिलासा मिळत असे, परंतु शासनाने आता हात झटकल्याने शेतकरी कोणाकडे पाहणार, अशी स्थिती आहे. सध्या मुरुड तालुक्यात 10हजार क्विंटल भात रब्बी हंगामातील पडून आहे. वस्तुतः 1 मे ते 30 जून हा कालावधी पणन महासंघाकडून भात खरेदी साठी दिलेला असतो. आठवड्याहून अधिक काळ लोटला तरी रब्बी हंगामातीत भात खरेदी करण्याचे आदेश केंद्र प्रमुखांना प्राप्त न झाल्याने भात खरेदी केंद्र प्रमुखांना शेतकर्‍यांना मोघम उत्तरे द्यावी लागत आहेत.

ऑनलाईन पोर्टलवर जिल्ह्यात रब्बी भात शेतीचे क्षेत्र 433 हेक्टर इतकी नोंद झाली आहे . 7/12 वर जोपर्यंत दुबार पीकाची नोंद होत नाही तापर्यंत त्याची नोंदणी होऊ शकत नाही. यदाकदाचित भात खरेदीला परवानगी दिली तरी लाभार्थ्यांना थेट बॅक खात्यात पैसे ट्रान्स्फर व्हायला अडचणी येतील. शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत.

के .बी ताटे, जिल्हा पणन अधिकारी
Exit mobile version