। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील औद्योगिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय दिघी पोर्ट माणगाव निजामपूर मार्गे विळे-भागाड एमआयडीसी हा रस्ता सध्या अरुंद व जीर्ण अवस्थेत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून निजामपूर शहरासाठी स्वतंत्र बायपास रस्ता करण्यात यावा, अशी ठोस मागणी निजामपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा निजामपूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तूशेठ पवार, युवा नेते मिलिंद फोंडके, सुधीर पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांना लवकरच भेटून सविस्तर चर्चा करून निवेदन देऊन लक्ष वेधणार आहेत.
या रस्त्याचा कारभार सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारित आहे. मात्र निधीअभावी रुंदीकरणाची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या मार्गाला केंद्र सरकारच्या खत्यारीतील येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. असे झाल्यास केंद्र सरकारकडून निधी मिळून या रस्त्याचे कायमस्वरूपी रुंदीकरण शक्य होईल, असा नागरिकांना विश्वास वाटत आहे. निजामपूर परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा मार्ग रुंद झाल्यास केवळ औद्योगिकच नव्हे तर पर्यटन क्षेत्रालाही नवी उभारी मिळेल. खा. सुनील तटकरे यांना भेटून निजामपुरातील रस्त्याचे रुंदीकरण आणि बायपास रस्ता या दोन मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्यास रायगड जिल्हा औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन क्षेत्रात एक नवा आयाम गाठेल, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.





