मुरुडमध्ये सीएनजी सेवा केंद्राची मागणी

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असून, सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे. सरकारही आता गो-ग्रीन या संकल्पनेचा पुरस्कार करत आहे. त्यातच प्रदूषण समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर क्राँप्रेस नॅचरल गॅस (सीएनजी) हा उत्तम पर्याय असल्याने किमान पर्यटनवृद्धीसाठी तरी सीएनजी गॅस सेवा मुरूड तालुक्यात सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुरूड हे पर्यटन केंद्र असून, दरवर्षी पाच लाख पर्यटक इथली सौंदर्य स्थळे पहायला येतात.

तालुक्यात सीएनजी सेवा उपलब्ध नसल्याने कार चालकांना वा ऑटो रिक्षावाल्यांना तब्बल 40 किलोमीटर लांब चौल-बागमळा येथे गॅस भरण्यासाठी जावे लागते. त्यात पेट्रोल पंपावर कायम सीएनजीसाठी मोठ्या रांगा लागलेल्या असतात. बर्‍याचदा रांगेत असतानाच गॅस संपला असा नामफलक लागल्याने इतक्या दूर गेलेल्या वाहन चालकांची निराशा होते.अशा वेळी पर्याय म्हणून नाईलाजाने पेट्रोल वा डिझेल घ्यावे लागते, अशी तक्रार खासगी वाहनचालकांची आहे.

रोह्यासारख्या शहरात तीन सीएनजी सेवा केंद्र असली तरी मुरुड ते रोहा हे अंतर 40 किमी आहे. सुट्टीच्या दिवशी काशीद, मुरूड येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने गॅसला मोठी मागणी असते. सीएनजी गॅस सेवा खुद्द अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा येथेसुद्धा अद्याप सुरू नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. पर्यटनवृद्धीसाठी तसेच इंधन खर्च वाचवण्यासाठी मूलभूत सोयी सुविधांमध्ये ही सेवाही ग्राह्य धरावी, असे मत मुरूडमधील ट्रॅव्हल्सचे व्यवसाय करणारे मनीष विरुकुड यांनी व्यक्त केले. जर सीएनजी केंद्र सुरु झाल्यास मुरुड-मुंबई तसेच मुरुड-पुणे या ठिकाणी खासगी वाहने जनसामान्यांना ही परवडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Exit mobile version