शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

| उरण | वार्ताहर |

सततच्या पावसामुळे उरण तालुक्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुरते संकटात सापडले असून त्यांना भातशेतीची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या कृषी विभागाने नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामा करावा. तसेच, मागील वर्षी पंचनामे करून ही ज्या पुरग्रस्ताना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी उरण तालुका मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.

यावर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने उरण तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यात भात लावणीच्या वेळी जुलै महिन्यात पावसाने संततधार सुरू केल्याने भात शेतीत पाणी साचून भाताची रोपे कुजली. त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला आहे. तरी, या नुकसान ग्रस्त भात शेतीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड सत्यवान भगत यांनी उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्याकडे सादर केलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे.

Exit mobile version