| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये बाराही महिने पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरूच असते. विशेषतः पावसाळ्यात येथील नयनरम्य देखावे न्याहाळण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण आरामात अनुभवण्यासाठी पर्यटक आवर्जून हजेरी लावत असतात. अनेकदा काही पर्यटक स्वतःच्या वाहनाने येथील नागमोडी घाटरस्त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असतात; परंतु, या रस्त्यावरील लोखंडी कठड्याला वारंवार धडक बसून त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरच याठिकाणी सुरक्षेसाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माथेरानमध्ये येण्यासाठी एकमेव घाट रस्ता हा एकमेव मार्ग आहे. तसेच चढ-उताराची नागमोडी वळणे आहेत.त्यामुळे काहीवेळा हा अवघड आणि अरूंद घाटावरून वाहन अतितीव्र चढावावर चालवताना त्यांची चालकांची दमछाक होते. काही ठिकाणी तर या रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे आपल्या लेनने वाहन चालवीत असताना पुढील अवघड वळणाचा त्यांना अंदाज येत नाही. त्यामुळेच सुरक्षित कठड्याला धडक बसून किरकोळ अपघात होत असतात. अशाच एका वॉटर पाईप रेल्वे स्टेशन खालील पिटकर पॉईंट या अवघड वळणावर अनेकदा अपघात घडले आहेत. अगदी अरुंद वळण असल्याने नवख्या वाहन चालकांना ताबडतोब स्टेरिंग सरळ करणे अथवा वाहन बाजूला घेणे जमत नाही. गोंधळून गेल्याने पिटकर पॉईंट येथून काही फुटांवर वाहने पडून अपघात घडत आहेत. सुदैवाने अद्यापही याठिकाणी जरी जीवितहानी झालेली नसली तरी सुद्धा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली अनेक उदाहरणे आहेत. या अपघात प्रवणक्षेत्र जागी असलेला संरक्षक कठडा अपघात होऊन तुटल्याने या पुढे ही इथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरच इथे सुरक्षेसाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माथेरान-नेरळ घाटातील वॉटर पाईपच्या खालच्या वळणावर यावर्षात सर्वाधिक अपघात झालेले आहेत. धोकादायक वळण असल्याने नवख्या वाहन चालकांना या वळणाचा अंदाज नसतो. त्यामुळे मजबूत संरक्षक भिंत किंवा रेलिंग केल्यास टूव्हीलर व फोरव्हिलर वाहन चालकांकडून होणारे अपघात थांबविता येतील. पीडब्ल्यूडी विभागाने याचा गांभीर्याने विचार करायला हवा, तसेच संपूर्ण घाटरस्त्यामध्ये खड्ड्याचे साम्राज्य असल्याने पर्यटक व वाहनचालकांना खूपच त्रासदायक व खडतर प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन या वळणावरील संरक्षक भिंत उभारण्यात यावी, जेणेकरून नागरिक व पर्यटकांचा प्रवास सुखाचा होईल.
चंद्रकांत जाधव,
माजी उप नगराध्यक्ष, माथेरान
