मुंबई-गोवा मार्गावरचे खड्डे भरण्याची मागणी

वाहन चालकांसह प्रवाशी वर्ग व पादचारी यांच्या जीवाला धोका

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची नवीन अंतिम मुदत पुन्हा डिसेंबर 2024 पर्यंत गेली असून आशा कितीतरी तारखा देण्यात आल्या आहेत. या राष्ट्रीय महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल, परंतु या मार्गावरीली खड्डे पहिले भरा, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गाकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरी करणाच्या कामाविषयी विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, या महामार्गासाठी नवीन ठेकेदार नेमले असुन हे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. परंतु, या फक्त वल्गना असल्याचे बोलले जात आहे. कारण आशा अनेक दिलेल्या तारखा फोल ठरल्याचे दिसून आले आहे. कारण मुंबई-गोवा महामार्गावरील वरसगांव, आंबेवाडी बाजारपेठे व खांब नाका येथे रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले असुन हे खड्डे दररोज भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, खड्डे काही भरेना! काळ भरलेला खड्डा दुसर्‍या दिवशी तसाच दिसून येत आहे. याला कारण निकृष्ठ दर्जाचे काम. तसेच, या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. आंबेवाडी नाक्यावर तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील खड्डे व चिखल यामुळे वाहन चालकांसह प्रवाशी वर्ग व पादचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 16 वर्षांपासून सुरु असुन या कामात कोणतीही प्रगती नाही. यासाठी शासनाच्या तिजोरीमधील करोडो रुपये वाया गेले आहेत. किती ठेकेदार आले किती गेले. परंतु, या कामात चांगला दर्जा नसल्याने बनविलेल्या साईड पट्टया व सिमेंट काँक्रेट रस्ते निस्कृष्ठ पद्धतीचे बनविलेले आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल परंतु महामार्गाला पडलेले खड्डे सिमेंट काँक्रेटने भरले जावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version