| खोपोली | प्रतिनिधी |
साजगांव सारसन गाव ते सारसन फाटा हा रस्ता अतिशय नादुरुस्त झाला असून, रस्त्याला मोठे-मोठे खड्डे पडले असून, त्यावरुन नागरिकांना, शालेय विद्यार्थी, वृध्द माणसांना चालणे तसेच वाहन चालकांना वाहन चालविणे अतिशय जिकरीचे झालेले असल्याने, प्रवास करित असताना रस्त्यावर असणार्या खड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सदरचा रस्ता दुरुस्ती करणे अथवा खड्डे भरण्यासाठी नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत, तसेच लोकप्रतिनिधी सुध्दा वारंवार विचारणा करित आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरा अथवा दुरुस्ती करा अशी मागणी साजगांव ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे.
खालापूर तालुक्यातील खोपोली, पेण मुख्य मार्गापासून सारसन गावात जाणार्या रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे. जेष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते. गावात जाणार्या या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली असून अर्धा किमी रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने रस्त्याला ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे.
या गंभीर घटनेची दखल घेत ग्रामपंचायतीच्या मासिक रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात यावा अशी चर्चा झालेली आहे. तरी सदरचा रस्ता दुरुस्ती करणेचे खड्डे भरणेचे काम करुन मिळावे, जेणेकरुन नागरिकांना व वाहनांना प्रवास करणे सुलभ होईल व अपघात टाळता येईल अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आल आहे.
विनोद खवळे
सरपंच -साजगांव ग्रामपंचायत