Fishermen’s Allowance: मच्छिमार भत्ता देण्याची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

मच्छिमार कुटूंबियांना जुन व जुलै या दोन महिन्यांचा उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा, अशी मागणी कोकणकिनारा मच्छिमार संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व संबंधित विभागांना करण्यात आली आहे.

सरकारी आदेशानुसार कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारी दि.1 जुन ते 31 जुलै कालावधीकरीता बंद करण्यात येणार आहे. तशा प्रकारचा आदेश सहा. मत्स्यव्यवसाय विभागाने जाहीर केलेला आहे. या दोन महिन्यांत माश्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे तसेच जोरदार पाऊस व वादळाचा धोका यामुळे मच्छिमारी बंद ठेवणे योग्यच आहे. परंतु, कोकण किनारपटट्टीवरील मच्छिमाऱ्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह संपुर्ण मच्छिमारीवर चालतो. पुढील 2 महिन्यांमध्ये त्यांना कुठलेही उत्पन्न नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचा उपजिविकेचा प्रश्न निर्माण होत असतो व आताही झालेला आहे. त्यांना या 2 महिन्यांकरीता उदरनिर्वाह भत्ता अथवा आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

नुकताच आंध्र प्रदेश सरकारने त्या राज्यातील मच्छिमारांच्या कुटूंबियांना दोन महिन्यांसाठी प्रतिमहिना 20 हजार रूपये देण्याचे मान्य केले आहे व त्याचे वाटप सुद्धा चालु आहे. महाराष्ट्र राज्य हे मच्छिमारी व्यवसायातुन मोठ्या प्रमाणात महसुल गोळा करते. तरी या सारख्या आर्थिक सधन राष्ट्राने गरजु मच्छिमारांसाठी आर्थिक मदत देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मच्छिमारांच्या प्रत्येक कुटूंबाला प्रतिमहिना 25 हजार प्रमाणे दोन महिन्यांचे 50 हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात कामगार नेते तथा संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार कॉ. भूषण पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन दिले व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Exit mobile version