गावरान भाज्यांना स्थानिक बाजारात मागणी

महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध

| पाली | वार्ताहर |

उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक कमी होते. त्यामुळे भाज्यांच्या किंमत वधारतात. मात्र जिल्ह्यासह सुधागड तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या-पाड्यांत घरालगतच्या परसात आणि डोंगरउतारावर, रानमाळात विविध गावठी भाज्यांची लागवड केली जाते. आरोग्यवर्धक गावरान भाज्यांना उन्हाळ्यात ग्राहकांकडून मोठी मागणी असते.

जिल्ह्यात पुणे व वाशी येथील मंडईतून भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत येतो. कमी उत्पादनामुळे उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक कमी होते. तसेच दरही वाढतात. त्यामुळे स्थानिक बाजारात आदिवासी व शेतकर्‍यांनी पिकविलेल्या भाज्यांना मागणी वाढते. त्यामुळे आदिवासी महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.

आदिवासींबरोबर काही शेतकरीही आता गावरान भाज्यांची लागवड करतात. सध्या बाजारात शिराळे, घोसाळे, कारले, माठ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, गवार, ठाकरी मिरच्या अशा गावठी भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदी 10 ते 15 रुपये जुडी, वाट्याने किंवा पाव किलो इतक्या स्वस्त दरात या भाज्या मिळतात. तसेच कोणत्याही रासायनिक खते किंवा किटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय खतावर तयार झालेल्या या भाज्यांना सध्या ग्राहकांकडून मागणी आहे.

धरण, नदी, विहीर, कालवा व ओढ्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात शेती बहरते. रोज पहाटे लवकर उठून डोक्यावर भाज्यांचे टोपली घेऊन आदिवासी महिला बाजारात दाखल होतात. गावरान भाज्या उपलब्ध होत असल्यामुळे स्थानिक लोक पुण्या-मुंबई वरून येणार्‍या भाज्यांवर अवलंबून राहत नाहीत. या आदिवासी महिला झेंडू आणि अस्टरची फुलेही देखील विक्रीसाठी आणतात.

Exit mobile version