| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानची शान समजल्या जाणाऱ्या मिनिट्रेनच्या वाढीव फेऱ्यांसाठी नवीन इंजिन उपलब्ध होईपर्यंत येथील पर्यटन खऱ्या अर्थाने बहरू शकत नाही. त्यासाठी लवकरच नवीन इंजिन उपलब्ध व्हावीत. या आशयाचे निवेदन माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना सुपूर्द केले आहे. बारणे हे मंगळवारी (दि.26)कर्जत रेल्वे स्थानकाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त आले होते. त्यावेळी माथेरानच्या ट्रेनचे गाऱ्हाणे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी खा. बारणे यांना ऐकवले.
अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान जी शटल सेवा उपलब्ध आहे त्यामध्ये दोन मालवाहू बोग्या असून, एक बोगी प्रथम दर्जा तर दोन बोग्या द्वितीय श्रेणीच्या आहेत. शटल मधून मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची ये-जा सुरू असते. परंतु, तीस आसनी बोग्यांमध्ये जागेअभावी तिकीट उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. त्यासाठी आणखीन दोन द्वितीय श्रेणीच्या बोग्या लावण्यात याव्यात. अमन लॉजपासून माथेरान स्टेशन पर्यंतचा मार्ग हा अवघड घाटमाथ्यामध्ये येत नाही. या रेल्वेच्या बाजूला टाकलेली खडी सततच्या रहदारीमुळे विस्कळीत होऊन पसरली जाते. त्यासाठी या रेल्वेच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक लावून चालण्यायोग्य मार्ग केल्यास सर्वांना सोयीचे ठरू शकते. माथेरानला बांधकाम साहित्य मनुष्यबळाच्या वाहतूक व्यवस्थेमुळे खूपच महाग मिळते. त्यासाठी नेरळहून पूर्वी मालगाडी सुरू होती ती पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी. जेणेकरून सर्वसामान्य लोकांना स्वस्तात सामान उपलब्ध होऊ शकते, असेही चंद्रकांत चौधरी यांनी निवेदनात नमूद केले आहे.







