| पनवेल | प्रतिनिधी |
मावळचे खा. श्रीरंग बारणे दिव्यांग संघटनेतर्फे पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग स्टॉल धारकांना त्वरित परवाने मिळावे याचे निवेदन 6 ऑक्टोबर रोजी देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र दिव्यांग विकास फाऊंडेशनचे जिल्हाप्रमुख भरत ज्ञानदेव जाधव, विलास फडके, अतुल रायबोले, नवनाथ गाढवे आणि इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.
महानगर पालिका हद्दीत दिव्यांग स्टॉलच्या माध्यमातून अनेक वर्षापासून व्यवसाय करत आहेत. परंतु, त्यांना महानगरपालिका वारंवार अतिक्रमण कारवाई करत आहे. त्यामुळे दिव्यांग स्टॉलधारकांवर नेहमी भीतीची टांगती तलवार असते. या विरोधात अनेक आंदोलने उपोषणे केली, मोर्चे काढले परंतु पनवेल मनपा आयुक्त फक्त आश्वासन देतात की सर्व दिव्यांग स्टॉलधारकांचे सर्वे करून तुम्हाला परवाने देतो. महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून चार वेळा आयुक्त आले आणि गेले. प्रत्येक आयुक्त फक्त आश्वासनाची पाने दिव्यांगांच्या तोंडाला पुसत असल्याचा आरोप दिव्यांग बांधव करत आहेत. ठराविक संघटनांच्या स्टॉल धारकांना परवाने दिलेले आहेत. इतर दिव्यांगांना परवाने का देत नाहीत हा दुजाभाव, भेदभाव का? केला जात आहे असा सवाल विचारला जात आहे. खासदारांनी याकडे स्वतः लक्ष घालून महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग स्टॉलला कायमस्वरूपी परवाने मिळवून द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.







