| तळा | प्रतिनिधी |
द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महिला सबलीकरण कक्षातर्फे स्त्रीशक्ती नोंदणी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम बुधवारी (दि. 8) राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींना या पोर्टलवर नोंदणी करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. संपूर्ण महाविद्यालयांमध्ये याविषयी जनजागृती करण्यात आली. महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अधिक सक्षम करणे, महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे, महिलांना व्यावसायिक आणि कौशल्य-आधारित प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देणे, महिलांना संकटकाळात मदत मिळवण्यासाठी आणि स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा उद्देश होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रमाधिकारी डॉ.दत्ता कुंटेवाड महिला सबलीकरण कक्ष समन्वयक डॉ. तृप्ती थोरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. बी एम.लोखंडे यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.







