पुणे, कोकणात पटकावला द्वितीय क्रमांक
| महाड | प्रतिनिधी |
टाईम्स ग्रीन गणेश स्पर्धेत काकरतळे तरुण ऊत्साही मंडळाने साकारलेल्या ‘आदर्श गाव’ या समाजप्रबोधनात्मक देखाव्याने यंदा पुणे व कोकण विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी (दि.8) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सिनेअभिनेत्री मृणाल देशपांडे आणि माधवी निमकर उपस्थित होत्या.
कोकणातील तरुण वर्ग रोजगाराच्या शोधात शहरांकडे वळत असल्याने गावे ओस पडत चालली आहेत, शेती कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर काकरतळे तरुण ऊत्साही मंडळाने समाजप्रबोधनाचा संदेश देणारा ‘आदर्श गाव’ हा देखावा साकारला. पूर्णपणे मातीपासून बनवलेल्या या देखाव्यात ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन आणि रोजगारनिर्मिती यांचे जिवंत चित्रण करण्यात आले. या देखाव्यात वृक्षलागवड, औषधी वनस्पती लागवड, देवराई संवर्धन, जलसंधारणाची कामे, सिमेंट नाला बांध, वळण बंधारा, कोल्हापुरी प्रकारचा बंधारा, शेततळे, वनतळे, समतल चर आदींचे प्रतिकृतीद्वारे दर्शन घडविण्यात आले. सोलर पंपद्वारे सिंचन, भाजीपाला व फळशेती, तसेच शेती उत्पादनावर आधारित प्रक्रीया युनिट दाखवून ग्रामीण रोजगाराचे आदर्श मॉडेल सादर केले. त्याचबरोबर गावातील कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, ग्रामपंचायत इमारत, झरे विकास प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा प्रणाली, सोलर ऊर्जा प्रकल्प, शोषखड्डे, बायोगॅस, बचतगटांचे व्यवसाय, औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यांचा समावेश करण्यात आला. गावातील आदर्श शाळा, क्रीडांगण, उद्यान, सीसीटीव्ही व्यवस्था, अभ्यासिका, ग्रामस्थांसाठी अवजार बँक, सौर पथदिवे, पर्जन्यमापक यांसारख्या उपक्रमांमधून गावाचे सर्वांगीण चित्र साकारले गेले.
या देखाव्याच्या निर्मितीसाठी मंडळातील लहान-मोठ्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या प्रयत्नाची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि टाईम्स ऑफ इंडिया समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी काकरतळे तरुण ऊत्साही मंडळाचे अध्यक्ष विशाल सावंत, सदस्य राहुल सावंत, राकेश घरटकर, राजा सुतार, रुपेश घरटकर, प्रवीण जोशी, सूरज सावंत, मेहुल सावंत, रितेश घरटकर, मयुर कदम, शैलेश सावंत, राधेय सुतार आणि साई सावंत आदी उपस्थित होते.





