। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल येथील जीवन पाटील हा शुक्रवारी (दि.21) त्याच्या गाडीवरुन जात असताना त्याला दुसर्या गाडीने खरचटले आणि त्याच गाडीने पुढे जाऊन रिक्षाला सुद्धा ठोकले. त्याबाबत जीवन पाटीलने संबंधिताला विचारले असता त्याने अरेरावीची भाषा केली आणि माझ्या हॉटेलवर ये असे सांगितले. त्यांच्या हॉटेलवर जीवन हा गेला असता तेथील हॉटेल कर्मचार्यांनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला केला.
जीवनने स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी हात पुढे केला असता त्याच्या दोन्ही हाताला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. त्याने तातडीने पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले. त्यानंतर तो खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेला असता तेथील पोलीस अधिकारी घागरे व साळुंखे यांनी त्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तसेच, त्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्याचे प्रयत्न करून विरोधकांना मदत केली. जीवन पाटील याच्यावरच जास्ती कलमे दाखल करण्यात आल्याचे अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष चाळके, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती पनवेलचे सदस्य बी.पी.लांडगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहसचिव विभाग, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना तक्रार केली असून जखमी जीवन पाटीलला शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.