। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिका हद्दीत असलेल्या मुंब्रा-पनवेल महामार्गावरील जाहिरातींच्या फलकांना अखेर एमएसआरडीसीकडून अनधिकृत असल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता हे जाहिरातींचे फलक धोकादायक व अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, याच जाहिरात फलकांना पनवेल महानगरपालिकेने परवानग्या दिल्या आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुंब्रा-पनवेल महामार्गावर असलेल्या मोठमोठ्या जाहिरात फलकांवर एमएसआरडीसीकडून हे जाहिरातींचे फलक धोकादायक आहेत; तसेच, एमएसआरडीसीच्या मालकी हक्काच्या जागेवर उभारण्यात आल्याचे सांगत ही जाहिराती फलक तात्काळ काढावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारची नोटीस लावण्यात आली आहे. तसेच, संबंधितांनी योग्य प्रतिसाद न दिल्यास एमएसआरडीसी त्यांच्यावर कारवाई करणार असली तरी, पनवेल महानगरपालिकेने या जाहिराती फलकांना परवानगी दिली आहे का? हा सवाल उपस्थित होत आहे. जर महापालिकेने त्यांना परवानगी दिली असेल, तर कोणत्या नियम व अटींच्या आधारे त्यांनी ही परवानगी दिली आहे, असा मुद्दा सध्या उपस्थित होत आहे.
पनवेल महापालिकेला एमएसआरडीसीच्या नोटिसीबाबत विचारणा केली असता, एमएसआरडीसीकडे या संपूर्ण प्रकाराबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे सांगितले. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मुंबई व पुणे मार्गिकेवर केवळ संपादित शासकीय जागेत अतिक्रमण करून अनधिकृत बोर्ड, होर्डिंग्ज लावल्या असल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. हे बोर्ड आणि होर्डिंग्ज अनधिकृत असून, धोकादायकही आहेत. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने हे बोर्ड व होर्डिंग्ज त्वरित काढावेत, अन्यथा एमएसआरडीसी कार्यालय कोणतीही पूर्वसूचना न देता ते हटवून जप्त करेल, असे या नोटीसमध्ये त्यांनी नमूद केले आहे.