सोमवारी पेणमध्ये बैठक
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील नवघर येथे एका कोळी समाजातील कुटुंबावर जाती अंतर्गत गाव कमिटीने सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला असल्याचा आरोप कोळी कुटुंबीयांनी केला आहे. गेली सात महिने कोळी समाजातील तीन कुटुंब तणावपूर्ण व संघर्षमय जीवन जगत आहेत. या प्रकरणी वाळीत कुटुंबियांना जलद न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करू असा इशारा ऑल इंडिया पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी वाळीत कुटुंबियांना न्याय देण्याच्या दृष्टीने सोमवारी बैठक लावून तोडगा काढू असे डीवायएसपी विभा चव्हाण यांनी आश्वासित केले आहे. केदार यांनी निवेदनाद्वारे म्हटले की कोळी कुटुंबाला वाळीत टाकून त्यांचं सामाजिक, आर्थिक शोषण केले आहे. डीवायएसपी यांच्याशी चर्चा करून तात्काळ बहिष्कार उठवण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा सर्व पंचावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने केली आहे.