पश्‍चिम मार्गावरून कोकण रेल्वेची मागणी

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

गेली अनेक वर्षें मुंबईतील पश्‍चिम उपनगरांत राहणार्‍या कोकण-गोवा वासियांच्या सोयीसाठी पश्‍चिम रेल्वेनेही गणेशोत्सव कालावधीत या मार्गावरुन नियमितपणे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आम्ही गेली काही वर्षें कोकण रेल्वेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये निवेदनाद्वारे या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहोत. आता तर कोकण रेल्वे वीजेवर धावत आहे. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेला मार्गिका सहज उपलब्ध होईल. पण दुर्देवाने कोकणातील आमदार खासदार या मागणीचा पाठपुरावा करताना दिसत नाहीत. पश्‍चिम रेल्वेने या मार्गावरून केवळ गणेशोत्सवासाठी जादा रेल्वे सोडण्यासह विनाविलंब मुंबई सेंट्रलसह बांद्रा, बोरिवली या टर्मिनस येथून नियमितपणे गाड्या सोडाव्यात. लोकप्रतिनिधींनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा. अशा प्रकारे गाड्या सोडल्यास पश्‍चिम रेल्वे परिसरातील कोकणवासियांना मध्य रेल्वे स्थानकांत येण्या जाण्यासाठी करावी लागणारी धडपड, तसेच, मध्य रेल्वेवर प्रवाशांचा होणारा प्रचंड गर्दीचा ताण कमी होईल, असेही केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version