| उरण | वार्ताहर |
गेली अनेक महिन्यापासून उरण पंचायत समितीमध्ये कायमस्वरूपी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) नाही. प्रभारी पदभार हा विनोद मिंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. परंतु, कायमस्वरूपी विस्तार अधिकारी नसल्याने अनेक विकासकामे व तक्रार अर्जाचे योग्य असे निवारण होत नाही. तरी उरण पंचायत समितीसाठी कायमस्वरूपी विस्तार अधिकारी यांची नियुक्ती जिल्हा परिषदेने लवकरात लवकर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केली आहे.
विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) अनिल नारंगीकर यांची मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर गेल्याने रिक्त झालेल्या जागेवर माणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) विनोद सुरेश मिंडे यांना माणगाव येथून उरण पंचायत समितीचा विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) अतिरिक्त कारभार दिलेला आहे. मिंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते माणगाव पंचायत न जाता पगार माणगाव पंचायत समितीमधून घेत आहेत. नियमानुसार उरण तालुक्याच्या जवळच्या एका पंचायत समिती विस्तार अधिकार यांना अतिरिक्त कारभार देणे गरजेचे असताना एवढ्या लांबून विस्तार अधिकारी देण्याचा प्रशासनाने चुकीचा निर्णय घेतल्याचे श्री. डाऊर यांचे म्हणण आहे. तरी याठिकाणी तात्काळ कायमस्वरूपी ग्रामविस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी श्री. डाऊर यांनी केली आहे.







