हायमास्ट दिवे पुन्हा सुरू करण्याची मागणी

। उरण । वार्ताहर ।

उरण शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या चारफाटा येथे सिडकोच्या माध्यमातून लाखों रुपये खर्च करून हायमास्ट दिवे सुरू करण्यात आले होते. ते गेली काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रकाशमय झालेला परिसर अंधारमय झाला आहे.

चारफाटा रस्त्याचे सुशोभीकरण सिडकोच्या माध्यमातून सुरू आहे. यावेळी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी रस्त्यावर हायमास्ट दिवे व सर्कलची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने सिडको प्रशासनाचे अभियंता मुंडे यांच्याकडे करून सातत्याने पाठपुरावा करून हायमास्ट दिवे व सर्कल बांधून ते दिवे 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे परिसर प्रकाशमय दिसत होता. परंतु महिना, दीड महिने हायमास्टचे दिवे सुरू होते. परंतु काही दिवसांपासून हे दिवे बंद पडले आहेत. दिवे वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद असल्याचे समजते. तरी बंद पडले हायमास्ट दिवे पुन्हा लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने प्रशासनाकडे केली आहे.

Exit mobile version