| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरान-कर्जत राज्यमार्गावरील कळंब येथील पुलावरून यावर्षी तब्बल तीनवेळा पाणी गेले आहे. त्यामुळे पुलाचा पृष्ठभाग पुराच्या पाण्यात वाहून गेला असून, वाहनचालकांना त्या ठिकाणी वाहने चालवणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचा पृष्ठभाग नव्याने डांबरीकरण करून तयार करावा, अशी मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर असलेल्या दहिवली मालेगाव येथील पूल कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाण्याच्या घटना घडत असतात. हा पूल पाण्याखाली गेल्यानंतर या भागातील 35 गावांचा संपर्क तुटतो. त्याचवेळी पुलावरून वाहतूक बंद झाल्यानंतर पर्यायी मार्गाचा अवलंब करून नेरळ रेल्वे स्टेशनवरून आता जावे लागते. यंदा आतापर्यंत तब्बल तीनवेळा उल्हास नदीवरील या पुलावरून पाणी गेल्याने पुलावरील डांबरी पृष्ठभाग वाहून गेला आहे. त्याचवेळी पुलाच्या कठड्यांना लावलेल्या लोखंडी सलाई देखील तुटल्या आहेत. तर, काही ठिकाणी महापुरात वाहून आलेली झाडे आणि पालापाचोळा अडकल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पावसाची उघडीप पाहून पुलाचा पृष्ठभाग नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी वाहनचालक यांच्याकडून करण्यात येत आहे.
दहिवली पुलाच्या दुरुस्तीची मागणी
