| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस झाला असून उल्हास नदीला पूर आला आहे. तालुक्यातील चिल्हार आणि पेज नदीला देखील पूर आला आहे. उल्हास नदीवरील मोहिली येथून पूल पाण्याखाली गेला आणि नंतर तत्काळ या भागातील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी सुरक्षा कठडे लावून रस्ता वाहतुकीस बंद केला.त्यानंतर याच नदीवरील दहिवली मालेगाव पूल रात्री पाण्याखाली गेला. त्या ठिकाणी दहिवली गावाचे पोलीस पाटील अनिल बारणेकर यांनी स्वतः पुलाच्या दहिवली बाजूला उभे राहून वाहतूक बंद करून टाकली. त्याचवेळी उल्हास नदीच्या पाण्याने भयानक रूप घेतल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात येत आलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने 25 कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम संभ्रम निर्माण करणारे ठरू लागले आहे. त्यात धामोते बाजूकडील भागात पोलिसांनी पहारा ठेवल्याने मोठा अनर्थ तळला आहे.दुसरीकडे नेरळ-कळंब रस्त्यावरील वाहतूक रात्रीपासून बंद ठेवण्यात आली आहे. या उल्हास नदीवर मागील वर्षी शेलू येथे बांधण्यात आलेल्या पुलावरून देखील पाणी गेल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली. त्या ठिकाणी पोलीस पाटील मनोज पाटील यांनी स्थानिकांना पुलावरून वाहतूक करू नये, असे आवाहन केले. मात्र, या भागात उल्हास नदीचे शेलू गावात असलेल्या चाळीमध्ये घुसले होते. तर, याच उल्हास नदीवर ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेला पाषाण येथील पुलावरून देखील पाणी जात असल्याने त्या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, या तिन्ही पुलावरून पाणी जात असल्याने नेरळपासून कळंब पाषाणपर्यंतचा संपर्क तुटला आहे.







