हातपाटी रेती उत्खननाकरीता राखीव क्षेत्राची मागणी

। महाड । प्रतिनिधी ।
हातपाटीने तसेच बुडी मारुन रेतीचा उपसा करण्यासाठी यापूर्वी ज्या पध्दतीने राखीव क्षेत्र ठेवण्यात आले होते त्याचप्रमाणे सावित्री नदीमध्ये विचारेवाडी ते दासगाव तसेच दासगाव ते सव या दरम्यान राखीव क्षेत्र देण्यात यावे अशी मागणी पारस हातपाटी वाळू उत्खनन विक्री सहकारी संस्थेने केली आहे. या बाबतचे निवेदन खा.सुनिल तटकरे यांना देण्यात आले आहे. महाड तालुक्यातील सावित्री नदीच्या पात्रांमध्ये भोई समाजासह इतर समाजातील लोकांकडून पिढ्यानपिढ्या रेतीचे हातपाटीने उत्खनन करण्याचा पारंपारीक व्यवसाय करीत आहेत. येथील कारखान्यांतील दुषित पाण्यामुळे या परिसरातील शेती आणि मासेमारीचे व्यवसाय बंद पडले असून अनेक तरुण बुडी मारुन रेतीचे उत्खनन करण्याच्या व्यवसायकडे वळले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा एकमेव व्यवसाय उदरनिर्वाहाचे साधन झाला आहे. 2004 मध्ये माजी आ. माणिक जगताप यांनी सातत्याने पत्र व्यवहार करुन राखीव क्षेत्र ठेवण्याची विनंती केली होती. या मागणीचा गांभिर्याने विचार करुन राज्य शासनाने गौण खनिज आणि महसूल वन विभागानी 24 डिसेंबर 2004 रोजीच्या आदेशान्वये विचारेवाडी ते दासगाव क्षेत्र हातपाटी पध्दतीने रेती उत्खनन करण्यासाठी राखीव गटातील परवाने देण्याचे आदेश दिले. मात्र अप्पर जिल्हाधिकारी यांनी सन 2017-18 पासून उत्खननाचे परवाने देणे बंद केले. त्यामुळे डुबी तसेच हातपाटीने रेतीचा उपसा करणारे आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांवर उपाशी राहाण्याची वेळ आली. पारंपारीक डूबी मारुन हातपाटीने उत्खनन करण्याकरीता कायमस्वरुपी परमीट पध्दतीने राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी पारस हातपाटी वाळू उत्खनन विक्री सहकारी संस्था मर्यादीत दासगाव ता.महाड यांनी केली आहे.

Exit mobile version