गणपतीपूर्वी रस्त्याच्या डागडुजीची मागणी

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

लांजा तालुक्यातील रूण गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच असल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे पादचारी, वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रूण रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना त्यामध्ये विशेषतः दुचाकी आणि रिक्षासारखी वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून एसटी वाहतूकदेखील सुरू आहे. या गावातील अनेक विद्यार्थी लांजा-साटवली या ठिकाणी हायस्कूल तसेच कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालयात जात असतात. तसेच, अन्य प्रवाशांचाही समावेश आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने ही वेळ आली असल्याचे बोलले जात आहे.

हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित हा येतो. संबंधित विभागाने गणपतीपूर्वी रस्त्याची डागडुजी करावी. तसेच, या रस्त्याचे पावसाळ्यानंतर तातडीने डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी रूण ग्रामपंचायत माजी सदस्य महेश जाधव यांनी केली आहे.

Exit mobile version