। तळे । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर-माणगाव दरम्यान विघवली हे गाव आहे. पूर्वी विघवली फाटा येथे एस.टी. निवारा शेड होती. ही शेड मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणामध्ये पाडण्यात आली. त्यामुळे विघवली परिसरातील विद्यार्थ्यांसह आबाळवृद्ध नागरिकांची फाट्यावर उभी राहण्याची गैरसोय होत आहे. विघवली गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा असून मातीची भांडी आणि मिठाचा व्यापार देखील होत असतो. त्याचबरोबर गावातील अनेक युवक युवती इंदापूर-माणगाव याठिकाणी उच्च शिक्षणासाठी तर नागरिक विविध ठिकाणी नोकरी आणि सरकारी कामानिमित्ताने विघवली फाट्यावरून जात असतात. या ठिकाणी निवारा शेड नसल्यामुळे कडक्याच्या उन्हात आणि पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड देत रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. याचा विचार करून एसटी महामंडळाने अथवा स्थानिक पुढार्यांनी विघवली फाटा येथे निवारा शेडची व्यवस्था करावी. जेणे करून लहानमुले, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण यांची उभे राहण्याची उत्तम सोय होईल. त्याचबरोबर उन्हाच्या व पावसाच्या त्रासापासून देखील बचावतील, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.