कार्लेखिंडीत माकडांसाठी स्कायवॉकची मागणी

| सोगाव | वार्ताहर |

रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबागकडे जाण्यासाठी अलिबाग-पेण मार्ग आहे. अलिबाग, मुरुडकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. तसेच, या मार्गावर आर.सी.एफ. कारखाना, उसर गॅस कंपनी, सालाव येथील जेएसडब्लू कंपनीकडे रोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असते. अलिबाग हा पर्यटकांसाठी मिनी गोवा असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. हा मार्ग कार्लेखिंड जंगलातून जात असल्याने या जंगलातील मोठ्या प्रमाणात असलेले वन्यप्राणी अन्नपाण्याच्या शोधात रस्ता ओलांडताना अनेक वेळा अपघात होऊन मृत्युमुखी पडत आहेत. वनविभागाने माकडांसाठी स्कायवॉक उभारावे, जेणेकरुन त्यांचे अपघात थांबतील, अशी मागणी प्राणीमित्र सचिन घाडी यांनी केली आहे.

माकडांना कार्लेखिंड जंगलात हवे असलेले खाद्य योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्याने व जंगलात वारंवार आग लागून त्यांचे खाद्य नष्ट होत असल्याने ही माकडे कार्लेखिंड येथे रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेला बसलेल्या फळविक्रेत्या व भाजीपाला, तसेच चहा बिस्किटे विकणाऱ्या दुकानांकडे, डोंगराखालील भागातल्या शेतात, आंबा व इतर फळबागांमध्ये अन्नाच्या शोधात भटकत असतात. यावेळी ही माकडे आपल्या लहानपिल्लांसह गर्भवती मादी ही अत्यंत वर्दळीचा असलेला अलिबाग-पेण रस्ता जोखीम घेऊन ओलांडत असतात. यामुळे अनेकदा भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांखाली अपघात होऊन ही माकडे मृत्युमुखी पडतात. यासाठी वनविभागाने माकडांसाठी खास कार्लेखिंड याठिकाणी किमान 2 स्कायवॉक उभारावे, जेणेकरून रस्ता ओलांडताना माकडांच्या जीवावर बेतून मृत्युमुखी पडू नये. वनविभागाने याठिकाणी लवकरात लवकर स्कायवॉक बांधावा, अशी मागणी अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते, प्राणीमित्र व पर्यावरण प्रेमी सचिन घाडी यांनी वनविभागाकडे केली आहे.

Exit mobile version