| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नुकत्याच घडलेल्या पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीत पाच वर्षीय चिमुकलीच्या अपहरण आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष सेलच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. तसेच, निवेदनाची प्रत रायगड जिल्हाधिकारी, पेणचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दोखील देण्यात आल्या आहेत.
पाटणेश्वर आदिवासी वाडीत घडलेल्या पाच वर्षीय निष्पाप चिमुकलीच्या अपहरण व हत्येच्या घटनेविरोधात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष सेलने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. निवेदनात, या घटनेला मानवतेला काळिमा फासणारी आणि समाजमन सुन्न करणारी घटना असल्याचे म्हटले आहे. तसेच, विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करून खटला प्रभावीपणे चालवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, कायदेशीर सहाय्य, समुपदेशन आणि आवश्यक संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.







