ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी

। उरण । प्रतिनिधी ।

माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता अनामत रक्कम भरूनही माहिती न देणाऱ्या ग्रामसेवक भास्कर पालकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्रकार घन:श्याम कडू यांनी केली आहे. लेखी तक्रार अर्ज करूनही आजतागायत तीन गटविकास अधिकारी बदलून गेले व नवीन गटविकास अधिकारी आले तरी कारवाई होत नसल्याने अधिकारी वर्ग ग्रामसेवक पालकर यांची पाठराखण करीत असल्याचे उघड होते. यापूर्वी मोहपाडा व इतर ग्रामपंचायतींमध्ये काम केलेल्या ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे समजते.

उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय निधीत भ्रष्टाचार होत आहे. त्यामध्ये चाणजे ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवूनही ग्रामसेवक यांच्याकडून माहिती दिली जात नाही. पत्रकार घन:श्याम कडू यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता, सदर माहितीचे अधिकृत शुल्क पावती फाडून त्यानंतरही माहिती मिळत नसल्याने अपील करूनही आजतागायत माहिती तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पालकर यांनी दिलेली नाही. त्यामुळे चाणजे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पालकर यांनी कामात कामचुकार केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी कडू यांनी उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे केली आहे. त्यावरही कारवाई करण्यास तत्कालीन गटविकास अधिकारी गाडे यांनी चालढकलपणा केली, त्याचबरोबर तत्कालीन गटविकास अधिकारी संजय भोये व रजपूत यांनीही याकडे दुर्लक्ष करीत ग्रामसेवक पालकर यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे उघड होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याची चौकशी करून कामचुकार करणाऱ्या ग्रामसेवक पालकर यांच्यासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या उरण पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी व इतर अधिकारी वर्गावर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार घन:श्याम कडू यांनी केली आहे.

Exit mobile version