| उरण | वार्ताहर |
तालुका वाईज पंचायत समितीला एकच ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी असणे अशा प्रकारचा आदेश आहे. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम उरण पंचायत समितीने करून तालुक्यात दोन ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी कार्यरत आहेत. याची विचारणा जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भालेराव व उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे करूनही ते याचे उत्तर देत नाही.
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी माणगाव पंचायत समितीमधून विनोद मिंडे यांची बदली उरण पंचायत समितीमध्ये झाली होती. ग्रामपंचायत निवडणूक होऊन काही दिवसांचा अवधी उलटूनही उरणमधील ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी अनिल नारंगीकर यांना पदमुक्त न करता ते आजही कार्यरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीचा कारभार हा एक ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी कार्यभार सांभाळू शकतो. अशा प्रकारचा सक्त आदेश असतानाही उरणमध्ये या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून सध्या तरी दोन ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी कार्यरत आहेत. याची जबाबदारी कोणी अधिकारी घेताना दिसत नाही.
याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भालेराव व उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे मोबाईल फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याबाबत लवकरच ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दाद मागून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
000000