तात्पुरत्या शौचालयांच्या सुविधेची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक गणपती विसर्जन स्थळी गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता, विसर्जनाच्या कालावधीत तात्पुरती शौचालये, टॉयलेट केबिन अथवा फिरते शौचालय व्हॅन उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात अनंत चतुर्दशीपर्यंत विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. या कालावधीत विसर्जन स्थळी मोठ्या संख्येने भाविक, नागरिक तसेच स्वयंसेवक उपस्थित राहतात. मात्र, अनेक विसर्जन घाटांवर पुरेशा शौचालयांची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 14 मधील बीपी मरीन अकॅडमीजवळील बंदर रोड येथील विसर्जन स्थळी फिरते शौचालय व्हॅन अथवा तात्पुरते टॉयलेट केबिन उपलब्ध करून द्यावे, अशी विशेष मागणी करण्यात आली आहे. तसेच, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक गणपती विसर्जन घाटांवर आवश्यकतेनुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

Exit mobile version